Sunday 1 January 2017

पुणे-संकेश्वर-पुणे ६०० किमी भाग-२

पुणे-संकेश्वर-पुणे ६०० किमी भाग-२

     साधारण ३०० किमी सायकल चालवल्यानंतर जेवताना घनपदार्थ लवकर घशाखाली उतरत नाहीत तरीसुद्धा त्यांना बळेच पोटात ढकलावे लागते. नाहीतर सायकल चालवण्यासाठी उर्जा कुठुन मिळणार? प्रत्येक घासाबरोबर पाण्याचा एक घोट घेतला की त्यांना घशाखाली ढकलायचे काम सोपे होते. भाताच्या एका घासाबरोबर मी एक चमचा सूप घेत होतो. सूप आणि भात खाऊन झाल्यावर मी लगेच परतीच्या तयारीला लागलो. छोट्या पंपाने दोन्ही चाकात १३० पीएसआय हवा भरुन घेतली म्हणजे कमी हवेमुळे वेग कमी व्हायला नको आणि पंक्चरची पण भिती नको. थंडीचा सामना करायचा होता त्यामुळे मी कान आणि डोके गरमच्या टोपीने मस्त झाकुन घेतले. तेवढ्यात आशिश तेथे आला आणि जाऊ या बरोबर म्हणाला. ईथुन पुढचा ३०० किमी सायकलप्रवास मी आता आशिशबरोबर करणार होतो. रात्री १० वाजुन ४५ मिनिटांनी आम्ही राजधानी हॉटेल (संकेश्वर) सोडले. संकेश्वरपासुन हायवेपर्यंतचा रस्ता एवढा खराब आहे की पुण्याच्या जवळपास उदाहरण देण्यासाठी एवढा खराब रस्ता कुठेच नाही. संकेश्वरचा फ्लायओव्हर ओलांडल्यानंतर उजवीकडे वळलो आणि सर्व्हीस रोडने महामार्गावर आलो. आता हाच महामार्ग आमचा रात का हमसफर होता.
टिप: रात्री १०:३० वाजता हॉटेल राजधानी बंद होते, नंतर जेवणाची ऑर्डर घेतली जात नाही.

     कर्नाटकच्या रस्त्यांवर कुठले डांबर वापरलेले आहे कोणास ठाऊक? सायकलच्या चाकांचे रोलिंग एकदम भन्नाट होते आणि सुसाट पळते. अगदी चढ असला तरीही सायकल चांगला वेग घेते. शोलेमधला गब्बरचा डायलॉग आठवतोय का? "ये रामगडवाले कौनसे चक्की का आटा खिलाते है रे?" बसंतीला पाहील्यावर गब्बरचा तो डायलॉग. तसाच डायलॉग माझ्या मनात आला ,"ये कर्नाटकवाले कौनसे चक्की से रोड बनवाते है रे?" या सुपरस्मुथ रोडमुळे तवंदी घाटाच्या माथ्यावर पोचायला काहीच तकलीफ झाली नाही. घाटाच्या उतारावरुन निपाणीकडे निघालो तेव्हा एक ससा डावीकडुन रस्त्यावर आला, माझ्या सायकलबरोबर थोडा धावला आणि पुन्हा डावीकडे त्या काळ्या अंधारात गडप झाला. हे एवढ्या क्षणार्धात की मी ससा म्हणेपर्यंत तो अदृश्य झाला होता. भित्रा ससा कुठला? काय एकेक अनुभव येतील काही सांगता येत नाही. तवंदी घाटाचा मस्त उतार असुनही अंधारामुळे जास्त वेगात जाण्याची भिती वाटत होती. मोठा हॅलोजन सोबत असायला हवा असे वाटायला लागले. निपाणीकडे जाताना छोटे छोटे चढ आहेत पण त्यातले थोडेच जाणवले. त्या अंधारात सायकलने वेग पकडला की समजायचे उतार लागलाय आणि पॅडल मारावे लागल्यास समजायचे की आपण चढावर आहोत. महामार्गाची गुणवत्ता वाखाणण्यासारखीच आहे. या रात्रीच्या प्रवासात दुसरा एक अचंबित करणारा प्रकार म्हणजे एक रस्त्यावरचा वेडा माणुस मध्यरात्री झॉंंबीसारखा रस्त्याच्या कडेने आमच्या दिशेने चालत येत होता. रस्त्याच्या कडेला राहणार्या वेड्यांचा अवतार कसा असतो हे वेगळे सांगायला नकोच. त्याचे ते पिंजारलेले केस आकाशाकडे पाहत होते. आम्ही त्याच्या शेजारुन गेलो तरीही त्याच्या चालीत आणि बघण्याच्या दिशेत कोणताही बदल झाला नाही. तसाच ताड ताड चालत निघुन गेला. न्युटनचा पहीला नियमच जणु तो. आम्ही त्याच्या शेजारुन गेलो हे त्याला कळले नाही की त्याने दुर्लक्ष केले कोणास ठाऊक? पण त्याचा अवतार असा होता की त्याने नुसते भॉ जरी केले असते ना तरी मी दहा फुट नक्कीच उडालो असतो. जाम खतरनाक दिसत होता तो. भय काय असते याचा बर्याच दिवसांनी अनुभव घेतला. निपाणी जवळ आल्यावर आम्ही एक ब्रेक घेतला आणि हृदयाची धडधड शांत केली. ताजेतवाने वाटल्यावर पुन्हा पॅडलवर पाय फिरवायला सुरुवात केली.

     हळूहळू आम्ही कागलच्या दिशेने आगेकुच करत होतो. आशिशच्या मागोमाग मी सायकल चालवत होतो. इतर ब्रेवेमध्ये पुणे जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केला तरी जीवात जीव आल्यासारखे वाटते पण या ब्रेवेमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश केल्यावर सुटकेचा निश्वास टाकला आणि आम्हाला हायसे वाटले. आपल्या मुलुखात आलो ही भावनाच खुप सुखावणारी होती. कागल आणि कागल एमआयडीसी मागे टाकत आम्ही कोल्हापुरच्या जवळ आलो. रात्रीच्या सायकलप्रवासाचा फायदा म्हणजे रस्ता खुप शांत असतो. मध्यरात्रीच्या आसपास अवजड वाहनांची गर्दीसुद्धा कमी असते. उलट्या दिशेने येणा-या दुचाकींची लुडबुड तर फार कमी म्हणजे अगदी नाही म्हटले तरी चालेल. सायकल, काळा डांबरी रस्ता आणि रात्रीचा काळोख हेच काय ते आपले सोबती. सायकल चालवण्यासाठी रात्रीची वेळ ही फार उत्साहवर्धक असते, गरज असते ती फक्त सायकल घेऊन हायवेवर जाण्याची म्हणजेच साहस करण्याची. त्या काळ्या डांबरावर मिणमिणत्या टॉर्चने उजेड आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याशिवाय आपल्या हातात काहीही नसते. ऊसाची वाहतुक करणारा एखादा ट्रॅक्टर मध्येच मोठ्याने गाणी वाजवत यायचा. ती गाणीही फार दर्दी असतात... उदा. "परदेशी परदेशी जाना नहीं...मुझे छोड के..मुझे छोड के" हे गाणं ऐकलं की मला माझा मित्र गणेश परदेशी आठवतो. तेव्हाही आठवला. मीही त्या गाण्याच्या काही ओळी गुणगुणलो. आशिश म्हणाला आपण कोल्हापुरजवळच्या मॅक्डीमध्ये थांबु तिथे आपल्याला काहीतरी खायला मिळेल. मॅक्डीमध्ये पोचलो तेव्हा त्यांनी बंद करण्याची तयारी चालु केली होती, रात्री २ वाजता ते बंद होते. मला मॅक्डीमधले काहीच आवडत नाही त्यामुळे खाण्याचा प्रश्नच नव्हता. मी सायकलजवळच मांडी घालुन बसलो आणि जर्सीच्या खिशातला एक प्रोटीनबार काढला. जबरदस्त ईच्छाशक्ती असल्याशिवाय हा प्रोटीनबार घशाखाली उतरवणे शक्य नाही. त्याची चवच जगावेगळी. पाण्याचे घोट आणि त्या बारचा एकेक घास असे मिश्रण करुन मी ते दिव्य संपवले आणि आम्ही तिथुन निघालो. पुढे एक टपरी दिसली. साखरही शरीरात जाईल आणि घसाही गरम होईल म्हणून चहा पिण्यासाठी थांबलो. लांब पल्ल्याच्या सायकल प्रवासात साखर आणि मीठ या दोन प्रमुख घटकांची शरीराला खुप आवश्यकता असते. पण नेमका तिथला चहा संपलेला होता. चहा पिण्याची एवढी ईच्छा झाली होती की नविन चहा होईपर्यंत वाट पाहत थांबलो आणि घसा गरम करूनच तिथुन निघालो. चहा पित असताना एक ट्रॅक्टर तिथे थांबला विना गाण्याचा. त्या ड्रायव्हरला मी म्हटले गाणी नाही लावली का? त्याला माझा रोख कळला नाही पण आशिश माझ्याकडे पाहुन हसला. या रात्रीच्या प्रवासात गाणी न लावता पळणारा हा एकच ट्रॅक्टर आम्हाला भेटला होता आणि आम्हाला तर सवय लागली होती गाणी ऐकण्याची. ऊसाचा ट्रॅक्टर म्हटले की गाणी पाहीजेच. आवाज वाढीव डीजे...

     आता आम्ही साई इंटरनॅशनल हॉटेलकडे मोर्चा वळवला. साई हॉटेल म्हणजे आमचा पुढचा चेकपॉइंट. रात्रीच्या त्या काळोखात वारणा आणि पंचगंगा नद्या ओलांडुन आम्ही साई इंटरनॅशनलला पहाटे ३ वाजुन ५० मिनिटांनी पोचलो. ईथपर्यंत ६०० पैकी ४०० किमी अंतर पुर्ण झाले.  आशिशला खुप झोप यायला लागली होती म्हणुन त्याने झोपण्यासाठी रुम्स मिळू शकतील का याची चौकशी केली पण काही उपयोग झाला नाही. मला थोडा थकवा आला होता पण सायकल चालवण्यास काहीही प्रोब्लेम नव्हता. मला माझे पोट थोडे बिघडल्यासारखे वाटायला लागले. हॉटेल नाही, रुम नाही आणि बाथरुमही नाही. आता काय करायचे? सर्वत्र पसरलेला काळोख आणि शांत वाहणारा एनएच४ हेच डोळ्यासमोर दिसत होते. ट्रेक करताना अशी बिकट परीस्थिती हाताळण्याचा अनुभव माझ्या कामास आला. याबद्दल सविस्तर लिहण्याची गरज नाही तुम्ही सुज्ञ आहात. झोपायला जागा न मिळाल्यामुळे आम्ही तिथुन निघालो. आता गारठयाने आम्हाला गारठवण्याची सीमा ओलांडली होती. काल दुपारच्या ऊन्हाने जर्सीच्या खिशात पाघळलेल्या कॅडबरी त्या गारठ्याने पुन्हा पुर्ववत म्हणजे घट्ट झाल्या होत्या. दुपारचे कडाक्याचे ऊन आणि रात्रीची हाडे गोठवणारी थंडी या दोन्ही गोष्टींचा अनुभव माझ्याबरोबर त्या कॅडबरीनेही घेतलेला होता.

     साई हॉटेलपासुन काही अंतर पुढे आल्यावर एक पेट्रोलपंप दिसला. दोन काचेची केबिन लांबुनच दिसत होती. काहीही करुन ईथे थोडी झोप घेऊ या असे आशिश म्हटल्यावर मीसुद्धा हो म्हणालो. एका केबिनमध्ये वॉचमन झोपला होता आणि दुसरी केबिन जणुकाही त्या मालकाने आमच्यासाठीच बनवुन ठेवली होती. वॉचमनची अगोदर परवानगी घेऊ असे आशिश म्हणाला पण मी म्हणालो अगोदर झोपु आणि मग परवानगी घेऊ म्हणजे नाही म्हणण्याचा प्रश्नच येणार नाही. हवाबंद काचेची केबिन मस्त ऊबदार होती. पैसे देऊनही त्या गारठ्यात अशी ऊबदार रुम मिळणे शक्य नव्हते. आमचे सौजन्य म्हणजे आमच्या सायकल्स घेऊन आम्ही त्या केबिनमध्ये गेलो नाही. दोन्ही सायकल्स केबिनच्या बाहेर डोळ्यांसमोर राहतील अशा लावल्या. आशिश आडवा झाला आणि त्याला मस्त झोप लागली. मी मांडी घालुन बसलो आणि डोके भिंतीला टेकवले. माझी नजर सतत सायकलवर होती. एकदोनवेळा डोळे मिटले परंतु मी लगेच सावध व्हायचो. सायकलची चिंता मला झोप लागु देत नव्हती. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर आम्ही तिथुन निघालो. निघताना नेमकी वॉचमनला जाग आली. तो बाहेर आला आणि म्हणाला,"विचारलं असतं तर काय नाय म्हणलो असतो का मी?" मला पण तेच म्हणायचे होते,"तुम्ही नाही म्हटलेच नसते म्हणुन आम्ही तुमची झोपमोड केली नाही, तुमची झोपमोड झाली असती म्हणुन आम्ही तुम्हाला ऊठवले नाही" झोपेचं कौतुक ऐकल्यावर गप्प बसला बिचारा. आम्ही त्याला धन्यवाद म्हणुन तिथुन निघालो. बोलबच्चन अमिताभ बच्चन करता आले पाहीजे, मग बरेचसे प्रोब्लेम सहज सुटतात.

     त्या ऊबदार केबिनमधुन बाहेरच्या थंडगार हवेत आल्यावर थंडीचा कडाका चांगलाच जाणवायला लागला. थांबण्याच्या अगोदर सायकल चालवताना एवढी थंडी जाणवत नव्हती. पण आता मात्र खरंच अंगात गारठा भरायला सुरुवात झाली होती. पावणेसहा वाजत आले होते. थंडी घालवण्यासाठी मी थोडी जोरात सायकल चालवायला लागलो. जोरात सायकल चालवल्यावर अंग गरम झाले आणि थंडी वाजायचे कमी झाले. कराड येईपर्यंत लख्ख उजेड पडला आणि सुर्याची किरणे सर्वदुर पसरायला लागली होती. मी चहाची टपरी शोधत होतो पण कुठेही चहा दिसला नाही. मग तसेच पुढे जाऊन कोयना नदी ओलांडल्यानंतर थोडी विश्रांती घेतली आणि ऊम्ब्रजकडे निघालो. तासवडे टोलप्लाझाच्या अलीकडे मला गियरशिफ्टींगमध्ये थोडा बिघाड झाल्याचे जाणवले. चढावर गियर कमी करण्याचा प्रयत्न करू लागलो पण गियर काही केल्या खाली सरकत नव्हते. एवढा चढ संपल्यावर बघु काय ते, म्हणुन मी तसाच सायकल चालवत राहीलो. आशिश थोडा पुढे निघुन गेला होता. टोल प्लाझाजवळ थांबुन पाहील्यावर मला कळले की पाठीमागच्या शिफ्टरची गियर केबल तुटलेली आहे. केबल तुटलेली पाहील्या पाहील्या माझ्या मनात आलेली पहीली भिती म्हणजे DNF. आता मी DNF होणार! एकतर या ६००च्या ब्रेवेला खुप खर्च आला होता आणि ४५० किमी अंतर सायकल चालवल्यानंतर DNF होण्यासारखे तर दु:खच नाही. फक्त १५० किमी बाकी होते. माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळल्यासारखे मला वाटायला लागले. विचारचक्र फिरवत राहील्यानंतर या काळोखातही मला एक आशेचा किरण दिसायला लागला. पाठीमागच्या शिफ्टरने केबल तुटल्यानंतर चेनला शेवटच्या गियरवर (आठव्या गियरवर) नेऊन ठेवले होती. याचा अर्थ आता मला पाठीमागचा गियर कमी करता येणार नव्हता परंतु पुढचा गियर एकवर घेऊन मी सायकल चालवु शकत होतो. यातसुद्धा चेन तुटण्याची भिती होतीच. पण "रिस्क तो स्पायडरमॅन को भी लेना पडता है..." रात्रंदिवस सतत ४५० किमी सायकल चालवल्यानंतर शेवटचे १५० किमी टॉप गियरवर सायकल चालवण्याची नामुष्की कोणावरही येऊ नये. ती आता माझ्यावर आलेली होती. शेवटी हुषार विद्यार्थ्यांना अवघड पेपर येणारच. तिथेच टपरीवर एक गरमागरम चहा घेतला आणि डोके थंडगार करुन घेतले. बरोबर घेतलेली शिदोरी थोडीशी पोटात ढकलली. आता भरपुर शक्तीची गरज लागणार होती. आशिशला गियर केबल तुटल्याची माहीती दिली आणि माझ्यासाठी वेळ वाया घालवु नको म्हणुन सांगितले. तो माझी वाट पाहत थांबला होता. त्याला वॉशरुमला जायचे होते आणि सायकलवर लक्ष ठेवायला कोणी नव्हते. मी त्याच्या सायकलवर पाळत ठेवली. त्याचे उरकल्यावर तो त्याच्या गतीने निघुन गेला. मीही आठव्या गियरवर हळूहळु त्याच्यामागे निघालो.

     उंब्रज ते सातारा आणि सातारा ते खंबाटकी हे टप्पे सायकलवर पार करताना तर गियर केबल शाबुत असतानादेखील माझी वाट लागते. गावागावात पसरलेले आणि सातारा येईपर्यंत न संपणारे ते फ्लायओव्हर्स सायकल चालवणा-यांचा अंत पाहतात. १x८ चा गियर रेशिओ वापरला तरीही प्रत्येक फ्लायओव्हरचा चढ पार करताना मला खुप शक्ती खर्च करावी लागत होती. एकतर तोंडाला काडीचीही चव राहीलेली नव्हती, फक्त खाल्लेला गोड पदार्थ तिखट लागण्याचाच बाकी होता. आणि अशा अवस्थेत शरीराला लागणारी उर्जा पुरवण्यासाठी मला ते बेचव प्रोटीनबार खावे लागत होते. सातारा खिंडीत तर चक्कर येऊन पडलो असतो एवढे जबरदस्त ऊन वाढले होते. शेवटी मी निम्मी सातारा खिंड सायकल हातात धरुन चालत चालत पार केली. सातार्यात गेल्यावर चवीत बदल म्हणुन एक वडापाव खाण्याचा प्रयत्न केला पण तो खुपच तिखट लागला. एक मॅंगोची बाटली प्यायलो आणि थोडावेळ विश्रांती घेऊन पुण्याच्या दिशेने निघालो. पुढे सातारा ते नागेवाडी पर्यंतचा टॉपगियरवरचा सायकलप्रवास मला जीवघेणा वाटत होता आणि तो जीवघेणाच निघाला. नागेवाडीपर्यंत पोचायला मला खुप श्रम आणि वेळ लागला. टोलनाक्यावर मी पुन्हा थांबलो. एक चहा पिलो, पाण्याचा स्टॉक अपडेट केला आणि निघालोच होतो तेवढ्यात एक फोर्ड गाडी माझ्यापाशी थांबली. आज कुठे राईड करुन आलाय वगैरे विचारपुस झाली. मी त्या अवस्थेतही थोडक्यात माहीती देण्याचा प्रयत्न केला. ते गृहस्थ कोण होते ते मला कळले नाही पण एवढे कळले की ते मला चांगले ओळखत होते. दुस-या दिवशी मला त्यांचा फेसबुकवर मेसेज आला तेव्हा मला कळले की ते माझे फेसबुकमित्र गिरीश कुलकर्णी होते. प्रत्यक्षात कधीही भेटलो नसताना त्यांनी मला हायवेवर ओळखले याचेच मला आश्चर्य वाटले होते. या हायवेवरची पाचवड आणि भुईंज येथील फ्लायओव्हरची कामे लवकर पुर्ण होवोत हीच सदिच्छा. हायवेची वाहने आणि गावातील वाहने एकत्र आल्यावर ट्रॅफीकचा कसा खेळखंडोबा होऊ शकतो ते याठिकाणी पहायला मिळते. खंबाटकीपर्यंतचा सायकलप्रवास तर मला सायकल सुस्थितीत असतानाही खुप कष्टप्रद वाटतो. गियर केबल तुटलेल्या अवस्थेतल्या प्रवासाची तर कल्पना केलेलीच बरी. प्रयत्नांची पराकाष्ठा करत सुरुरपर्यंत पोचलो. येथे विश्रांती घेऊन दोन ग्लास ऊसाचा रस पिलो. आणि टॉपगियरवर सायकल चालवत चालवत कसाबसा खंबाटकी गाठला. खंबाटकी बोगद्याकडे जाताना लागणारा छोटासा चढही मला झेपला नाही. सायकलवरून उतरण्याची ईच्छा नसतानाही मला चालत जावे लागले. खंबाटकी बोगद्यात शिरताना सुटकेचा निश्वास टाकला. त्या थकलेल्या अवस्थेत खंबाटकीच्या उताराचा नीट आस्वाद घेता आला नाही. संपुच नये असा वाटणारा उतार आज नकोसा वाटत होता. उतार कधी एकदा संपतोय असे झाले होते. मला प्रचंड भुक लागली होती. उतार संपल्या संपल्या डावीकडे जे हॉटेल दिसले त्यात शिरलो. मला उत्तपा खायचा होता पण त्या हॉटलात मिळाला नाही. दुसरे काही तोंडात धरवेल असं वाटत नव्हते. म्हणून मी पुन्हा फक्त टोमॅटो सुप घेतले. 

     टोमॅटो सुपचा आस्वाद घेत असताना राहुल गाढवेचा फोन आला, कुठेपर्यंत पोचलाय? औंधला कधी पोचशील वगैरे विचारून त्याने काळजी घेण्यास सांगितले आणि फोन ठेवला. मला तुटलेली गियर केबल खुप त्रास देत होती. टॉप गियरमुळे पोटावर सुद्धा ताण पडत होता आणि त्यामुळे आता पोटात दुखायला लागले होते. मी आता बिस्कीटांकडे वळलो होतो. पोटात भर घालणेसुद्धा गरजेचे होतेच. मजल दरमजल चालु असताना मला दत्ता पवार भेटले. सातारा राईड करून ते पुण्याकडे चालले होते. सारोळ्याजवळ सुनिल धाडवेंनी मला आवाज दिला. ओळखीचा आवाज वाटल्यामुळे मी थांबलो. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या आणि पुन्हा प्रवास सुरू ठेवला.  

     कसलाही छोटा चढ मला सायकलवर खुप त्रास देत होता. कापुरहोळ ते नसरापुर दरम्यान पुन्हा थोडी विश्रांती घेतली. नसरापुर मागे टाकल्यावर माझा उत्साह वाढायला लागला. मी वेग वाढवायला सुरूवात केली. शिवापुरपर्यंत सुसाट आलो पण तिथल्या ट्रॅफिकने माझ्या वेगावर ब्रेक लावले. ईथेही पुलाच्या कामामुळे खेळखंडोबा चालु होता. शिंदेवाडीचा निम्मा चढ चालत आणि निम्मा सायकलवर पार केला. कात्रज बोगद्याकडे जाताना पुन्हा वेग वाढवला आणि एकदाचा कात्रज बोगद्यात शिरलो. उतारावरून सुसाट आल्यावर नवले ब्रीजवर थांबलो. राहुल गाढवेला फोन करून सांगितले की मी आता जवळ आलोय. काही बिस्कीटे खाल्ली आणि मी चांदणी चौकाच्या चढाकडे निघालो. चांदणी चौकाचा शेवटचा चढ मी चालत चालतच गेलो. राहुल कार घेऊन औंधकडे जाताना मला ओव्हरटेक करून गेला आणि आवाजही दिला. पण मी त्याला प्रतिसाद देण्याच्या अवस्थेतही नव्हतो, मी फक्त मान हलवली. इथुन पुढे आता एकही चढ नाही या कल्पनेनेच मी खुप सुखावलो होतो. बावधन, पाषाण तसेच एनसीएल मागे टाकत मी सकाळनगरकडे वळलो. स्टारबकला पोचण्यास ट्रॅफिकचा अडथळा चांगलाच जाणवला. कधी एकदाचे स्टारबक येतेय असे मला झाले होते. साडेसहाला ब्रेवेकार्ड ओंकारकडे दिले आणि या सायकल चालवण्याच्या त्रासातुन मुक्त झालो. या कॅलेंडर वर्षात एकही DNF न होता SR झालो हे विशेष. ६००चे DNF थोडक्यात वाचले. हे माझे कारकिर्दीतले दुसरे SR. गियर केबलविना चाललेला क्लेशदायक सायकलप्रवास एकदाचा संपला. सुरुवातीचे ४५० किमी लवकरात लवकर पुर्ण केलेले असल्यामुळे गियर केबल तुटुनही शेवटचे १५० किमी पुर्ण करण्यासाठी माझ्याकडे प्रचंड वेळ शिल्लक होता, यामुळेच मी ही ६०० ची ब्रेवे पुर्ण करु शकलो. या ब्रेवेसाठी मला ३६ तास २१ मिनिटे लागली.
     राहुल गाढवे दुपारपासुनच माझ्या संपर्कात होता. कधी पोचणर आहेस? असे तो आवर्जुन विचारायचा. फिनिशपॉइंटपासुन घरापर्यंत माझी सायकल आणि मला कारमध्ये टाकुन नेणार होता तो. सायकल चालवत घरापर्यंत जायला लागु नये म्हणुन मित्राने घेतलेली ही काळजी. राहुल कोंढाळकरसुद्धा फिनिशला कार घेऊन आला. या दोन मित्रांनी माझे जंगी स्वागत केले. एक कुंडीमधील रोपटे भेट देऊन त्यांनी माझे अभिनंदन केले. आता मी ते माझ्या गॅलरीतल्या बागेत ठेवले आहे. स्टारबकला स्वागत करण्यासाठी अमित भरतेसुद्धा आले होते. आम्ही रात्री सेलिब्रेशनचे प्लॅनिंग केले आणि ऊशिर व्हायला नको म्हणुन आम्ही लगेच तेथुन निघालो (CHIVAS Moments).

     गियर केबल तुटली हे चांगलेच झाले. जो होता है वो अच्छे के लिये... दुसर्या दिवशी मेकॅनिककडे जाऊन मी गियर केबल बदलायला शिकलो आणि एक केबल जवळ बाळगायला सुरुवात केली. तसेच केबलविना गियर कसे बदलायचे हे केबलहॅक सुद्धा शिकलो. आता कधीही गियर केबल तुटली तरी त्याचा अतिरीक्त त्रास मला होणार नाही एवढे मात्र नक्की. पंक्चरच्या त्रासानंतर आता हा केबलचा त्रास उगिच डोक्यात जायला नको. चेन तुटण्याची शक्यता लक्षात घेऊन एक मॅजिक लॉकसुद्धा मी आता जवळ ठेवणार आहे. होऊ दे खर्च !!

     माझे हे एसआर आणि ६०० ची ब्रेवे मी डॉ. चंद्रशेखर बेंद्रे यांना समर्पित करीत आहे. भावपुर्ण श्रद्धांजली !!!

सर्व फोटो भाग १ मध्ये लोड केलेले आहेत.
भाग - १ साठी येथे क्लिक करा
भाग - १

Thanks & Regards
Vijay Vasve (वसवे)
न-हे, पुणे.
9850904526














माझे हे एसआर आणि ६०० ची ब्रेवे मी डॉ. चंद्रशेखर बेंद्रे यांना समर्पित करीत आहे. भावपुर्ण श्रद्धांजली !!!


No comments:

Post a Comment

कुंभार्लीचा राजा सायकल शर्यत

शर्यतीचे नाव - कुंभार्लीचा राजा आयोजक - चिपळूण सायकलिंग क्लब मार्ग - बहादुर शेख नाका (चिपळूण) ते कुंभार्ली घाटमाथा अंतर - 29 किमी तारीख ...